हिंदी भाषा परीक्षा लागू करण्याचे प्रयोजन, तिचे स्वरुप व कार्यपद्धती याविषयीची वस्तुस्थिती प्रथम समजून घेणे आवश्यक असल्याने, या प्रकरणात हिंदी भाषा परीक्षेच्या प्रारंभापासूनची सद्यस्थिती सादर केली आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 343 345 च्या तरतुदी विचारात घेता 26 जानेवारी, 1965 पासून हिंदीचा भारताची राजभाषा म्हणून वापर करण्याची तरतूद केलेली असल्याने, तसेच त्यापूर्वी देखील काही राज्यांमध्ये शासकीय प्रयोजनासाठी हिंदी भाषेचा वापर केला जात असल्याने, शासकीय प्रयोजनांसाठी हिंदी भाषेचा वापर करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी सक्षम होण्याच्या दृष्टीने, तत्कालीन मुंबई सरकारने, शासन निर्णय क्रमांक 2541/34,दिनांक 1 सप्टेंबर,1951 अन्वये, राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याने, नियुक्त झाल्यापासून 3 वर्षांच्या मुदतीत पुढील 4 परीक्षांपैकी एक परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले होते. या परीक्षेचा दर्जा पुढील परीक्षांशी समकक्ष होता :-

  1. महाराष्ट्र राजभाषा सभा, पुणे यांची प्रवीण परीक्षा.

  2. गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद यांची विहित परीक्षा (चौथी परीक्षा)

  3. हिंदुस्थानी प्रचार सभा, वर्धा व मुंबई यांची काबिल परीक्षा

  4. कर्नाटक हिंदी प्रचार सभा, कारवार यांच्याकडून घेतली जाणारी दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेची प्रवेशिका.

विहित 3 वर्षांच्या मुदतीत वरीलपैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या कर्मचारी/अधिकाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढी रोखण्याची तरतूद या निर्णयान्वये केलेली होती. तसेच वरील 4 परीक्षेंपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण नसलेला उमेदवार 1 एप्रिल, 1954 नंतर मुंबई शासनाच्या सेवेत नियुक्त होण्यास पात्र नसल्याची तरतूद देखील या निर्णयात केलेली होती.

त्यानंतर, शासन निर्णय क्रमांक इएक्सआर-1155,दिनांक 2 जुलै,1955 या निर्णयान्वये पदांच्या श्रेणीनुसार हिंदी भाषा परीक्षेची उच्चश्रेणी व निम्नश्रेणी हिंदी भाषा परीक्षा अशी वर्गवारी करण्यात आली आणि शासकीय कर्मचारी/अधिकाऱ्यांसाठी पुढीलप्रमाणे हिंदी परीक्षा लागू करण्यात आल्या :-

(1) अखिल भारतीय सेवेतील व राज्य सेवेतील राजपत्रित पद धारण करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आणि विवरणपत्रअ मध्ये नमूद केलेल्या वर्गतीन दर्जाचे पद धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच दुय्यम सचिवालयीन सेवेतील उच्च स्तरावरील (upper division ) व सचिवालयातील लघुलेखकांसाठी हिंदी भाषा उच्चश्रेणी परीक्षा लागू करण्यात आली.

(2) नोंदणी शाखेचे प्रमुख आणि दुय्यम सचिवालयीन सेवेतील टंकलेखक आणि विवरणपत्र अ व ब मध्ये समाविष्ट नसलेले वर्ग 3 चे पदधारक यांसह निम्न श्रेणीचे (lower division ) कर्मचारी यांच्यासाठी हिंदी भाषा निम्नश्रेणी परीक्षा लागू करण्यात आली.

(3) विवरणपत्र ब मध्ये समाविष्ट असलेले निम्नश्रेणीचे (lower division ) कर्मचारी आणि वर्ग चार चे कर्मचारी यांच्यासाठी हिंदीची बोलभाषा चाचणी लागू करण्यात आली.

त्यानंतर, भाषिक प्रांत रचनेनुसार, 1 मे,1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर देखील वरीलप्रमाणे हिंदी भाषा परीक्षा घेण्यात येत होत्या. या परीक्षा एतदर्थ हिंदी परीक्षा मंडळामार्फत सामान्य प्रशासन विभाग घेत होते. परिपत्रक क्रमांक इएक्सएम-1661-जे, दिनांक 25 ऑक्टोबर,1961 अन्वये एक वैकल्पिक किंवा अनिवार्य विषय म्हणून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना /अधिकाऱ्यांना एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षेतून सूट देण्यात आली. त्यानंतर वैकल्पिक किंवा अनिवार्य विषय म्हणून हिंदी विषयासह विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना/अधिकाऱ्यांना देखील एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षेतून परिपत्रक क्रमांक इएसएम-1663-जे, दिनांक 14 ऑक्टोबर,1963 अन्वये सूट देण्यात आली.

वर नमूद केल्याप्रमाणे, 2 जुलै,1955 च्या शासन निर्णयान्वये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना लागू केलेली बोलीभाषा प्रमाण श्रेणी परीक्षा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही असा निर्णय शासन निर्णय क्रमांक 1966-, दिनांक 1 ऑक्टोबर,1966 अन्वये घेण्यात आला. तसेच हिंदी भाषेच्या प्रसाराचे काम करणाऱ्या खाजगी संस्थांच्या परीक्षांना एतदर्थ मंडळाच्या उच्चश्रेणी व निम्नश्रेणी परीक्षांशी समकक्ष मान्यता देण्याचा आणि अशी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी एतदर्थ मंडळाची हिंदी भाषा उच्चश्रेणी किंवा निम्नश्रेणी परीक्षेला बसण्याची आवश्यकता नाही असा निर्णय, शासन निर्णय क्रमांक हिंभाप-3566-, दिनांक 19 डिसेंबर, 1966 अन्वये घेण्यात आला.‍ हिंदी भाषा उच्चश्रेणी व निम्नश्रेणी या दोन्ही परीक्षांसाठी 100 गुणांच्या 2 प्रश्नपत्रिका असलेली लेखी परीक्षा व 50 गुणांची मौखिक परीक्षा लागू करण्यात आली 100 गुणांच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत किमान 50 गुण असलेल्या उमेदवारास लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्याची व मौखिक परीक्षेतील 50 गुणांपैकी किमान 25 गुण असलेल्या उमेदवारास, मौखिक परीक्षेत उत्तीर्ण होण्याची तरतूद या नियमान्वये करण्यात आली.

शासन निर्णय, क्रमांक हिंभाप-1976-28, दिनांक 10 जून,1976 अन्वये, हिंदी भाषा परीक्षेच्या संबंधात नियमावली तयार करण्यात आली. या नियमावलीनुसार एतदर्थ मंडळाच्या उच्चस्तर व निम्नस्तर हिंदी भाषा परीक्षा दर्जा, अनुक्रमे माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या उच्चस्तर व निम्नस्तर हिंदी भाषा परीक्षेच्या समकक्ष ठेवण्याची आणि माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ हिंदी भाषा परीक्षेसाठी वेळोवळी जो अभ्यासक्रम ठरवील तोच अभ्यासक्रम या परीक्षांसाठी निश्चित करण्याची तरतूद केली. तसेच वयाची 45 वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना/ कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेतून सूट देण्यात आली.

तसेच,सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 10 फेब्रुवारी, 1978 च्या निकषांप्रमाणे पडताळणी करण्यास अधीन राहून, मातृभाषा हिंदी असलेल्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना तसेच तांत्रिक स्वरूपाची कामे करणाऱ्या वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांना आणि सेवा प्रवेश नियमानुसार नियुक्तीसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील एतदर्थ मंडळाच्या विहित हिंदी भाषा परीक्षेतून सूट देण्याची तरतूद शासन निर्णय क्रमांकहिंभाप-1081-305-वीस, दिनांक 21 जून, 1982 अन्वये करण्यात आली.

तसेच हिंदीसंस्कृत, हिंदीउर्दू, हिंदीमराठी (50-50 या प्रमाणात) इत्यादी सारखे संयुक्त विषय घेऊन 50 गुणांच्या हिंदी विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना शासन निर्णय क्रमांकहिंभाप-1083/1448/वीस, दिनांक 1 डिसेंबर,1984 अन्वये एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षेतून सूट देण्यात आली. तसेच मसुरी, अबू व डेहराडून येथे प्रशिक्षण घेत असताना, परिवीक्षा कालावधीत राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या महाराष्ट्र कॅडरच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील एतदर्थ मंडळाची हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यातून शासन निर्णय क्रमांक हिंभाप-1085/684/20, दिनांक 19 नोव्हेंबर,1985 या अन्वये सूट देण्यात आली.

वरील नियमाप्रमाणे, वर्षातून दोन वेळा भाषा संचालनालयामार्फत एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा उच्च श्रेणी व निम्न श्रेणी परीक्षा नियमितपणे घेतल्या जात आहेत. मंत्रालयीन विभागांसह राज्यातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी या परीक्षेला सतत बसतात. आजमितीस 33863 इतक्या कर्मचाऱ्यांनी /अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा उच्च श्रेणी व 4650 कर्मचाऱ्यांनी हिंदी भाषा निम्न श्रेणी परीक्षा दिलेली आहे.